मुंबई : वृतसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असतांना आता राज्याचे मतदान डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात असून झारखंड विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील निवडणुका होतील असे चिन्ह दिसू लागले आहेत. विधानसभेची मुदत संपल्यानंतर निवडणुका होणार असल्याने नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचे आणखी 2 ते 3 हप्ते जास्तीत जास्त महिलांच्या खात्यावर जमा व्हावे, यातून महिलांचे मतदान आपल्याला व्हावे यासाठी निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती. मात्र, या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा जम्मू-काश्मीरमधील मतदान पूर्ण झाल्यावरच जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट केले. यात जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. म्हणजेच चार ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर आठवडाभराचा अवधी तरी घोषणेसाठी दिला जाईल. निवडणुकांच्या घोषणेनंतर 45 दिवसांचा कालावधी मिळतो. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आलं.यावर त्यांनी असा प्रश्न विचारणं सोपं आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणतात की, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे संकेत दिले आहेत. कोणत्याही राज्यामधील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याची मूभा निवडणूक आयोगाला असते. त्यामुळेच विद्यमान विधानसभा 26 नोव्हेंबरला बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबर होणार असेल तर मधल्या कालावधीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता आहे.