मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर येत असतांना नुकतेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली परिसरात एका व्यक्तीने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांना कारने चिरडले. या अपघातात ५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनतक आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अंबरनाथचे रहिवासी बिंदेश्वर शर्मा याने मंगळवारी सायंकाशी ५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या सफारी कारने वडिलांच्या फॉर्च्युनर एसयूव्हीला धडक दिली. या घटनेत ५ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. बिंदेश्वर शर्मा याचे वडील सतीश शर्मा हे निवृत्त वरिष्ठ संरक्षण अधिकारी आहेत. ते मुलगा आणि सून यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मुंबईहून अंबरनाथला आले होते. दरम्यान, फरार असलेल्या संशयित आरोपीचा त्याच्या वडिलांशीही वाद झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
मुंबईत राहणारे सतीश हे घरातील वाद मिटवण्यासाठी मंगळवारी पत्नी आणि लहान मुलगा आणि ड्रायव्हरसह अंबरनाथला आले होते. पण बिंदेश्वर जिथे राहतो तिथे पोहोचल्यावर त्यांना तो तेथे दिसला नाही. जेव्ही ही घटना घडली तेव्हा ते सुनेची समजूत काढून ते परत मुंबईला जात होते. सतीश हे अंबरनाथमधील सेव्हन लेव्हल हॉटेलजवळ पोहोचले असता त्यांना बिंदेश्वर त्याच्या सफारीतून मागून वेगाने येताना दिसला. बिंदेश्वरला बोलायचे आहे असे समजून त्यानी ड्रायव्हरला कार बाजूला घ्यायला सांगितली आणि ते एसयूव्हीमधून बाहेर पडले. पण तरीही बिंदेश्वरने कार थांबवली नाही. त्याच्या कारने उभ्या असलेल्या एसयूव्हीला ओव्हरटेक करत ड्रायव्हरसह तिघांना उडवले आणि तो पुढे निघून गेला. एवढ्यावर न थांबता त्याने पुन्हा मागे फिरत वेगाने वडिलांच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला समोरून आपली कार धडकवली. या दरम्यान त्याने कार चालकाला सुमारे १०० फूट फरफटत नेले.
या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाच्या एसयूव्ही चालकाने आधी पांढऱ्या एसयूव्हीच्या बाहेर उभ्या असलेल्या काही लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यानंतर काळ्या एसयूव्ही चालकाने यू-टर्न घेत पुन्हा पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला समोरून धडक देत फरफटत मागे नेले. काळ्या रंगाच्या SUVने पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीला धडक दिल्याने पाठीमागे उभ्या असलेल्या दुचाकीवरील एक पुरुष आणि एक महिलाही जखमी झाले. दरम्यान, या व्हिडिओमध्ये काही संतप्त लोक काळ्या एसयूव्हीवर दगडफेक करताना दिसतात. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.