मुंबई : वृत्तसंस्था
बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध राज्यातील प्रत्येक गावात सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती. या संदर्भात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर बसवला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा….
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.
आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का ?
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.
माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.