नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील आंध्र प्रदेश राज्यातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत बुधवारी (21 ऑगस्ट) दुपारी 2.15च्या सुमारास आग लागली. या अपघातात आधी 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र रात्री उशिरा प्रशासनाने 17 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. तर 36 जण जखमी झाले आहेत. सर्वांना जिल्ह्यातील एनटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना अच्युतपुरम सेझ येथील फार्मा कंपनी एस्किएंटियाच्या प्लांटमध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रथम कंपनीच्या रिॲक्टरजवळ आग लागल्याचे दिसले, त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. कारखान्यात 381 हून अधिक कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करत असल्याने जखमींची संख्या जास्त असू शकते असे लोकांनी सांगितले. घटना घडली त्यावेळी बहुतांश कर्मचारी जेवणासाठी गेले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर सॉल्व्हेंट ऑइल पंप केले जात असताना गळती झाली आणि आग लागली. यामुळे 500 किलोलिटर कॅपेसिटर रिॲक्टरमध्ये स्फोट झाला.या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. कारखाना व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
गरज भासल्यास जखमींना एअर ॲम्ब्युलन्सने इतर रुग्णालयात नेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आरोग्य सचिवांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आज स्वतः कारखान्याला भेट देणार आहेत. ते मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असून जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयातही जाणार आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अधिकाऱ्यांना कारखान्यांमध्ये सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सुरक्षा मानके आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले. ष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुसरीकडे, आपल्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप केला आहे.