ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

पहिल्या दिवशी ८० अतिक्रमणे उद्धवस्त; दर मंगळवारी मोहीम चालणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरामध्ये नगरपरिषदेकडून पुन्हा एकदा अतिक्रमणावर जेसीबी फिरवला जात असून एकाच दिवसात ८० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.आता आठवड्याच्या दर मंगळवारी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय आता केवळ रस्त्यावरची आता अतिक्रमणे हटवली जाणार नाहीत तर अनधिकृत बांधकामे देखील आमच्या रडारवर आहेत.ज्यांना नोटीसा दिलेले आहेत त्यांचे अनधिकृत बांधकाम फौज फाटा लावून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.अक्कलकोट शहर हे तीर्थक्षेत्र आहे.या ठिकाणी लवकरच तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात येणार आहे.त्या दृष्टीने शहरातील रस्ते आणि चौक हे अतिक्रमण मुक्त करण्याचा आमचा मानस आहे.

या आराखड्याला अडथळा असणारी सर्व अतिक्रमणे काढली जातील.यात कोणाचीही हाय गय केली जाणार नाही.पहिल्या टप्प्यामध्ये ए- वन चौक ते कारंजा चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आले.यामध्ये पहिल्या दिवशी ८० अतिक्रमणे उध्वस्त करण्यात आली असून पुढच्या आठवड्यात बस स्टॅन्ड परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात येईल.दर आठवड्याला एक परिसर घेऊन अतिक्रमणाची बजबजपुरी दूर केली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.शहरात काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे देखील आहेत त्या बांधकाम मालकांना यापूर्वी नगरपालिकेने नोटीस दिली आहेत तसेच ज्यांच्याबाबतीत नवीन तक्रारी प्राप्त होतील.त्यांच्याही अर्जाचा विचार करून अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नगरपरिषद प्रशासन प्राधान्याने निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी नगर अभियंता अभिषेक काकडे नेतृत्वाखाली शुभम माहुरे, उत्कर्ष उकरंडे,विनायक येवले,महिबूब शेख,प्रथमेश हालोळी, नितीन शेंडगे,बालाजी पारखे अशी टीम तयार केली आहे.ही टीम सर्व विषय हाताळणार आहे.यात नगर परिषदेच्या तीस सफाई कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

 

अनधिकृत होर्डिंग व बॅनरवर थेट गुन्हे

अलीकडच्या काळात अक्कलकोट शहरामध्ये नगरपरिषदेला न विचारता मनमानी पद्धतीने होर्डिंग आणि बॅनर लावण्यात येत आहेत. त्याबाबतही आम्ही दक्ष असून लवकरच अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरवर कसल्याही पद्धतीचा विचार न करता थेट गुन्हे दाखल करणार आहोत.त्यामुळे अधिकृत परवानगीशिवाय कोणीही बॅनर
लावू नये.

  • रमाकांत डाके,मुख्याधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!