मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना विरोधक सत्ताधारीवर टीकास्त्र सुरु असतांना बदलापूर येथील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड मध्ये एक उदाहरण देत नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी थेट आरोप करत मुख्यमंत्री खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. या दाव्यावरुन उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले अशा सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला होता. विरोधकांच्या या आरोपाला मुख्यमंत्र्यांनी थेट पुरावा दाखवत प्रत्युत्तर दिले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट न्यायालयाच्या आदेशाची प्रतच दाखवली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. एका नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले असल्याचा दावाही त्यांनी पुन्हा एकादा केला. तसेच विरोधकांना उत्तर देत हे प्रकरण पुण्यातील मावळ मधील असल्याची माहिती दिली. या प्रकरणी शिवाजीनगर एप्रिल 2024 मध्ये विशेष सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतच मुख्यमंत्र्यांनी दाखवली. इतकेच नाही तर मी दिलेला शब्द पाळणारा माणूस असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मी कधीही खोटे बोलत नसल्याचेही ते म्हणाले.
बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशीच झाली पाहिजे. अशी मागणी सरकार न्यायालयात करणार असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बदलापूरमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र दुसरीकडे विरोधक त्याचे राजकारण करत असून हे सर्वात मोठे दुर्दैव असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आठ तास रेल रोकोच्या माध्यमातून अडवून धरण्यात आले होते. आंदोलन करताना ताबडतोब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर आंदोलकांकडे कसे आले? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. अशा प्रकारचे राजकारण करू नका, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे राज्यातील वातावरण दूषित होईल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.