छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रेम प्रकरण मोठ्या चर्चेत येत असतांना नुकतेच जळगावला येथे महोत्सवासाठी गेलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघातील एका विद्यार्थिनीला रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून कंत्राटी कर्मचाऱ्याने छळल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थिनीने १६ मे रोजी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. पण अंतर्गत तक्रार निवारण समितीने कारवाईऐवजी त्याला अभय दिले. दोन महिने जुने प्रकरण असले तरी कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारींच्या दालनासमोर अभाविपने गुरुवारी (२२ ऑगस्ट) ठिय्या दिला.
प्रशासनाने अभाविप कार्यकर्त्याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजभवनतर्फे राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव जळगावला अयोजित केला होता. यात विद्यापीठ संघ सहभागी झाला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका कॉलेजची विद्यार्थिनीही संघात विद्यापीठातर्फे सहभागी होती. या विद्यार्थिनीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात विद्यापीठाकडे तक्रार केली. संघासोबत गेलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने त्या विद्यार्थिनीवर प्रेमाचे जाळे टाकण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले होते.
मात्र महोत्सव संपल्यावर सर्वजण आपापल्या घरी परतले तरीही त्याने व्हिडिओ कॉल करून त्रास दिला. कंटाळून मग तिने १६ मे रोजी विद्यापीठात तक्रार दिली. कुलगुरूंनी नियमानुसार ही तक्रार विशाखा समिती अर्थात अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे पाठवली. पण विद्यार्थिनी संलग्नित कॉलेजची असून विद्यापीठाची नाहीये, अशी सबब सांगून तक्रार निकाली काढली होती. यात ‘त्या’ कंत्राटीला अभय मिळाले. कॉलेजच्या समितीकडे किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी, असा अजब सल्लाही पीठासन अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांनी दिला होता. शिवाय कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या व्याख्येत ही तक्रार बसत नसल्याचा जावईशोधही लावला गेला. आता या प्रकरणाने भडका घेतला असून गुरुवारी अभाविपने कुलगुरूंच्या निषेधार्थ ठिय्या दिला आहे. यांसदर्भात कुलगुरू डॉ. फुलारी यांनी गुरुवारी दुपारी विशाखा समिती आणि विद्यार्थिनीची एकत्रित बैठक घेतली. बैठकीत विद्यार्थिनीचे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी घेण्याचे आदेश दिले आहेत.
“कुलगुरू हमसे डरते है, पुलिस को आगे करते है”, “कुलगुरू हमको पढने दो, देश को आगे बढने दो”, “विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय” अशा घोषणांनी कुलगुरूंचे दालन कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले होते. महानगर सहमंत्री चिन्मय महाले आणि प्रदेशमंत्री वैष्णवी ढिवरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलन संपल्यावर कुलगुरूंनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना केली. त्यानंतर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांचे पत्र घेऊन सुरक्षा अधिकाऱ्यांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठले.