नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील भुसावळ नजीकच्या वरणगाव परिसरातील भाविकांची बस शुक्रवारी नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वच भाविक भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. सदर भाविक पोखरा येथून काठमांडूला (क्र. यूपी ५३ एफटी ७६२३) जात होते. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीकाठी दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते. ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच नेपाळच्या सीमेवर असलेल्या महाराजगंज (उत्तर प्रदेश) जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
२७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली आहे. रामजीत ऊर्फ मुन्ना, सरला सुहास राणे (वय ४२). भारती प्रकाश जावळे (६२), तुळशीराम तावडे (६२), सरला तावडे (६२), संदीप राजाराम सरोदे (४५), पल्लवी संदीप सरोदे (४३), अनुप हेमराज सरोदे (२२), गणेश पांडुरंग भारंबे (४०), नीलिमा सुनौल धांडे (५७), पंकज भागवत भंगाळे (४५), परी गणेश भारंबे (८), अनिता अविनाश पाटील, विजया कडू जावळे (५०), रोहिणी सुधाकर जावळे (५१), प्रकाश नथ्थू कोळी (५०) यांचा समावेश आहे.
जळगाव येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे काल्याचे कीर्तन २१ रोजी झाले. या कथेसाठी जळगाव आणि इतर ठिकाणाहून जवळपास १५०० भाविक अयोध्येला गेले होते. या सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देव दर्शनासाठी तीन बसेसमधून रवाना झाले. त्यापैकी एक बस दरीत कोसळली.