नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतांना सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे देखील दौऱ्यावर असतांना त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विद्यमान सरकार व महाविकास आघाडीवर विशेषतः शरद पवार यांच्यावर अत्यंत तिखट टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. पुलोदच्या स्थापनेपासून हा प्रकार सुरू झाला. त्यांनी गणेश नाईक, नारायण राणे, छगन भुजबळ असे अनेक नेते फोडले. त्यानंतर जातीचे विषही त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यावेळचा महाराष्ट्र पाहिला तर राष्ट्रवादीच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात केव्हाच महापुरुष व संतांची जातीपातींत विभागणी झाली नव्हती. पण 1999 नंतर असे घडण्यास सुरुवात झाली.
राज ठाकरे म्हणाले, मागच्या 5 वर्षांत राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला, त्याला लोक कंटाळलेत. लोकसभेला 400 पारची घोषणा आणि संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे मुस्लीम व दलित समाजाने एकगठ्ठा मतदान केले. हे मतदान अँटी मोदी व अँटी शहा असे होते. ते काही उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी मतदान नव्हते. ती वाफ आता निघून गेली आहे. त्यामुळे विधानसभेला गोष्ट वेगळी आहे. कारण 5 वर्षांपूर्वी मतदारांबरोबर जी प्रतारणा झाली, ते लोक विसरलेले नाहीत. या गोष्टीचा राग विधानसभेच्या निवडणुकीला नक्की काढतील. हे मला दौऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. येथील मतदारांनी मागील 50 वर्षांत असा चिखल केव्हाच पाहिला नव्हता. मतदार ही गोष्ट केव्हाच विसरणार नाहीत. या गोष्टींचा राग ते आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच काढतील, असे ते म्हणाले.