सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर येथे शळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत असून याच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीने मूक आंदोलन केले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मूक आंदोलन झाले. यावेळी महायुती सरकारवर निशाणा साधत जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे जात आहे.
जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. आपल्या मुलांना शाळेत पाठवताना देखील पालकांना आता भीती वाटत आहे. सरकारचे प्रेम हे पुतण्या मावशीचे आहे. महाराष्ट्र बंदबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन आम्ही केले आहे. कोर्टाचा अवमान होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात आम्ही तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करत आहे. तसेच पुढे अशा घटना होऊ नये अशी मागणी आम्ही करतो आहोत.”
पुढे जयंत पाटील म्हणाले, सरकारी खर्चातून वेगवेगळे इव्हेंट, प्रचाराच्या कार्यक्रमासाठी पोलिसांना राबविले जात आहे, यामुळे झालेल्या गुन्ह्यांची नोंद करून त्याचा तपास करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. बदलापूरच्या घटनेत पोलिसांना 12 तास लागले गुन्हा नोंद करण्यासाठी. एवढ्या वेळात पुरावे नष्ट होण्याची भीती असते. ठाणे जिल्ह्यातील नेमलेले पोलिस हे मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने नेमले आहेत. त्यामुळे लगेच कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी लावला आहे.