अक्कलकोट (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले येथील मैंदर्गी गाणगापुर रोड वरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्त निवास आज देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आले. याची सुरुवात मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे दिनांक १७ मार्च २०२० पासून प्रशासनाच्या आदेशानुसार येथील भक्त निवास बंद ठेवण्यात आले होते. प्रशासनाच्या आदेशानुसारच देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आज दिनांक १५/१२/२०२० रोजी स्वामी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना राहण्याकरीता देणगी मुल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. भक्त निवास मधील सर्व २२८ खोल्या व सर्व हॉल स्वच्छ धुऊन घेण्यात आले असून परिसराचीही साफसफाई करण्यात आलेली आहे. भक्त निवास खोल्यांमध्ये व परिसरात सॅनिटायजरची फवारणी करून सर्व खोल्या निर्जंतुकीकरण करून घेण्यात आलेले आहेत. याची अंमलबजावणी नियमितपणे भविष्यातही करण्यात येईल.तसेच देवस्थान लगत असलेले देवस्थानच्या मुरलीधर मंदीर येथील निवास व्यवस्थाही स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून सुरूवात करण्यात आली आहे असे स्पष्ट करून स्वामी भक्तांनी स्वामींच्या दर्शनाकरिता व निवासा करिता निश्चिंतपणे येऊन लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.
मी एक निस्सीम स्वामीभक्त असून ज्यावेळी अक्कलकोटला येतो त्यावेळी देवस्थानच्या भक्तनिवास मध्ये राहण्याचा एक आगळा-वेगळा समाधान लाभतो. लॉकडाऊन नंतर मंदिर चालू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे, परंतु भक्तनिवास केंव्हापासून भाविकांच्या सेवेत रुजू होईल याची उत्सुकता होती. कोरोना अनलॉक नंतर आज मंदिर समितीने भक्त निवास माझ्यासारख्या भाविकांना राहण्याकरिता उपलब्ध करून देऊन महेश इंगळे व समितीने स्वामी सेवेचा आशीर्वाद घेतला आहे.
– नंदकुमार पेडणेकर, देवगड
स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जी शांती लाभते त्याप्रमाणेच स्वामींच्या भक्त निवास मध्ये राहण्याचे समाधान काही औरच. कारण येथे येऊन राहिल्यानंतर भक्तनिवासच्या अत्यंत रमणीय व शांततामय परिसरात स्वामींच्या मूर्तीसमोर बसून जप, नामस्मरण, श्रद्धेय भक्तिभावाने करता येते. या माध्यमातून लाभलेले समाधान व भक्ती प्रेमाचा आनंद नेहमीच स्मरणात राहतो.
– रश्मी पुराणिक, मुंबई