सोलापूर, दि. 24 : माणसाच्या मनातील बेचैंनी, भय कमी करण्यासाठी विपश्यना साधनेचा उपयोग होतो. विपश्यना ही प्रत्येकांनी अनुभवावी अशी साधना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात पसरलेली चिंता, भय व नकारात्मकता दूर होण्यासाठी विपश्यना साधनेचा उपयोग होईल. मनाची स्वच्छता आणि प्रत्येकास मन:शांती मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
‘मित्र’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद / महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षण विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित दोन दिवशीय विपश्यना शिबीराच्या समारोपात श्री.शंभरकर बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्करराव बाबर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय जावीर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुलभा वटारे, सुधा साळुंखे, प्रशासनाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. श्री .राठोड यांनी शिक्षकांनी विपश्यना साधना करण्यासाठी शिक्षण आयुक्त डॉ.विशाल सोळंकी यांनी काढलेल्या परिपत्रकाची माहिती दिली. राज्यस्तरावरुन दि. 24 आणि 25 सप्टेंबर 2020 रोजी ऑनलाईन विपश्यना प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवून ‘मित्र’ उपक्रम सर्व शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत श्री.राठोड यांनी आवाहन केले.शिबीराच्या यशस्वीतेसाठी केशव शिंदे, श्री.खाडे , डॉ.किरण गजधने, सुधाकर शिंदे, श्री.उकरंडे, सतीश जगताप व प्रकाश सचेती आदींनी परिश्रम घेतले.