मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लाडकी बहिण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. शिंदे गटाचे मंत्री श्रेयवादावरुन चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची योजना आहे. पण अजित पवार यांचा पक्ष सर्वश्रेय आपल्याकडे घेतोय, असा शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप होता.
दरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ नाव असताना फक्त ‘माझी लाडकी बहिण योजना’ असं नाव दिलं जातय, यावर आक्षेप घेण्यात आला. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. मात्र या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आलेला नाही.
मंत्रिमंडळात झालेल्या या वादावादीवर नंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. “ही श्रेयवादाची लढाई नाही. लाडकी बहीण योजना तिन्ही पक्षाच्या सरकारने आणली. कुठल्याही सरकारने कुठलीही योजना आणली, तरी मुख्यमंत्र्यांच श्रेय असतं. तिन्ही पक्ष आपपाल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. खरं श्रेय बहिणींच आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, या दृष्टीने तिन्ही पक्ष प्रचार करतायत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.