सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेबाबतीत दुजाभाव
मुख्याध्यापकांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
अक्कलकोट : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन दिवसांपूर्वी मैंदर्गी शाळेत सलगर व उडगीच्या केंद्रप्रमुखांनी तालुका पातळीवरील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पडताळणी केली होती.
त्यावेळी या दोघांनी वर्गात जाऊन गुणवत्ता, स्वच्छता याबद्दल निरीक्षण केले. वर्गावर गेले आणि मुख्याध्यापकांसोबत वर्गावर येण्यास मनाई केली.नंतर भौतिक सुविधा, परसबाग व इतर सर्व बाबीबद्दल चौकशी केली.यावेळी सर्व गुण तक्ता पेन्सिलने लिहिले आणि मुख्याध्यापकांना सही करा,असे म्हणाले.मी सही देतो पण पेनचा वापर करून गुण द्या,असे मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले. त्यानंतर आम्हाला अधिकार नाही,आम्ही त्या समितीचा सदस्य नाही,आम्हाला पोच देता येत नाही ,असे
केंद्रप्रमुख म्हणाले.अधिकार नसताना तुम्ही मग का आलेत असे विचारल्यानंतर ते निघून गेले,अशी तक्रार मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी केली आहे. यावरून पुन्हा एकदा आमच्या शाळेवर अन्याय असे मला वाटते असेही ते म्हणाले.
दरम्यान या उपक्रमासाठी माझी शाळा पात्र असताना कमी गुण देऊन मला डावलत आहेत,असा आरोप त्यांनी यावेळी केला. याबाबत गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन जे केंद्रप्रमुख तपासणीसाठी गेले होते.ते पदसिद्ध केंद्रप्रमुख आहेत.ते तोतया वगैरे नाहीत. शासनाच्या नियमानुसार शाळा गुणवत्ता तपासणी तसेच स्पर्धेत सहभागी शाळांची तपासणी सुरू आहे.२२ केंद्रांमधून २२ पात्र शाळांची तपासणी चालू आहे. त्यातून एक, दोन आणि तीन नंबर काढले जाणार आहेत.
ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे ते म्हणाले.