मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर राहुल गांधी असतांना त्यांनी एका मुलाखतीत आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन काँग्रेसचा आरक्षण संपवण्याचा मनसुबा उघड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून, आम्ही आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू, असे ते म्हणालेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे एका मुलाखतीत बोलताना राहुल यांनी कळीच्या आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही. तुम्ही आर्थिक आकडे पाहिले तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवेत, असे ते म्हणाले होते.
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एका ट्विटद्वारे राहुल गांधींच्या या विधानावरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.
आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू.