मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने जागावाटपात आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदाही झाला होता. याऊलट शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महायुतीला जबर फटका बसला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीपुढे हीच परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात असताना आता महाविकास आघाडीतही अनेक जागांवर मतभेद असल्याचे समोर येत आहे.
विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत 125 जागांवर मतैक्य असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे मविआत 288 पैकी उर्वरित 163 जागांवर मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सूत्रांनीही या जागांवरून काँग्रेस, ठाकरे गट व शरद पवार गटात जोरदार रस्सीखेच असल्याचा दावा केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीतील घटकपक्षांत 125 जागांवर एकमत असल्याचे स्पष्ट केले. याचा अर्थ उर्वरित 163 जागांवर तिन्ही घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक गणेशोत्सवानंतर होणार आहे. आघाडीत काही जागांवर एकमत आहे. विशेषतः 125 जागांवर कोणतीही अडचण नाही. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्याच्या विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले, देशात लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीत हिंदू, मुस्लिम, दलित असा भेदभाव करता येत नाही. शिवसेनेची मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला त्यात काहीही गैर वाटत नाही. शिवसेना लोकशाही, संविधानाला मानते असाच त्याचा ध्वनित अर्थ होतो. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचाही दावा केला. महायुतीच्या कालच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले नाही. सर्वांचेच चेहरे पडलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेजही नव्हते. याचा अर्थ त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या प्रवासात अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हे सुरू आहे, असे ते म्हणाले.