बीड : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील प्रचंड अॅक्टिव्ह झाले असून त्यांनी राजकीय नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं चित्र आहे. मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती. आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे. माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे. उपोषणापूर्वी आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही. मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही. माझा मायबाप समाज आरक्षणाची आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही आहात.
सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण मिळालं तर ते सूर्य चंद्र असेपर्यंत राहील. आरक्षण हा आपला हक्क आहे. राजकीय लोकांना डोळ्यासमोर ठेऊ नका. समाजाच्या लेकरांसाठी मी जीवाची बाजी लावत आहे. आरक्षण मिळाल्यावर माझा समाज मोठा होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.