बीड : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकी जाहीर होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी देखील उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांची चर्चा शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांसोबत सोबत सुरू आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. ज्योती मेटे या बीडमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या आधी देखील त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी केली होती. त्यामुळे आता या वेळी त्या काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्ष कोणत्यातरी पक्षात विलीन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिवसंग्राम पक्ष कोणत्याही परिस्थितीत विलीन होणार नसल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लढवण्यावर आमचा भर असेल, असे देखील ज्योती मेटे यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष किमान पाच जागा लढवणार असल्याचे ज्योती मेटे यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले होते. मात्र, आता महायुती आणि आघाडी सोबत त्यांची चर्चा सुरू आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागात पाच जागा लढण्याची तयारी शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून केली जात आहे. तर बीडमधून स्वतः ज्योती मेटे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. बीडमधून कोणत्या मतदारसंघातून लढणार यावर महायुती आणि आघाडी सोबत त्यांची चर्चा सुरू आहे. बीडमधून कोणत्या मतदारसंघातून लढावे याची चाचपणी त्यांनी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.