सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी गायब झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी नेहमीच दिसत असते. नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार यशवंत माने यांनी शनिवारी ता.१४ रात्री साडेदहा वाजता अचानक भेट दिली. त्यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर आढळून आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी तात्काळ वैद्यकीय अधीक्षक यांना फोन करुन गैरहजर डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पुणे – सोलापूर व पंढरपूर – कुर्डूवाडी महामार्गावर शेटफळ हे गाव आहे. वाहनांची सतत वर्दळ असलेले हे ठिकाण आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका सतत सुरू असते. अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांनी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आहे.
शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास येथून जात असताना त्यांनी रुग्णालयाचे कामकाज कसे चालू आहे? रात्रीच्यावेळी येथे निवासी डॉक्टर आहेत का? रुग्णांना सेवा कशी दिली जाते? यासाठी जाता जाता भेट दिली असता त्यांना त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच वैद्यकीय अधीक्षकांना फोन करुन जाब विचारला. गैरहजर डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.