मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसली असली तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, निवडणुका वेळेत आणि दोन टप्प्यात होतील, असे मला वाटते. विधानसभा निवडणुका 12 नोव्हेंबरपर्यंत दोन टप्प्यात होऊ शकतात, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
जुनी पेन्शन देऊ असे सांगणारे सत्ता असताना काय करत होते, असा सवाल त्यांनी केला. जुन्या पेन्शनएवढीच नवी पेन्शन योजना कर्मचार्यांच्या फायद्याची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यात आम्हाला अधिक स्वारस्य आहे. लोकांना काम करणारे सरकार हवे आहे. त्यामुळे पुन्हा महायुती सत्तेत येईल, असे भाकीत त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली जाईल. त्यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आगोयाकडून हालचाली सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची सूचना गुप्तचर विभागाकडून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात मागील अनेक वर्षे एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. तथापि, सध्या राज्यात आंदोलनांचा जोर वाढलेला असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा विषय निर्माण होण्याची शक्यता आहे. 2004 पासून राज्यात विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. चारही वेळा एकाच टप्प्यात मतदान झाले. 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात झाली होती आणि त्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट झाला होता.