सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने सरकारला इशारा देत असताना नुकतेच मराठा योध्दा मनोज जरांगे आणि बार्शीचे आ.राजेंद्र राऊत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आ.राऊत यांनी आंदोलन करत विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. मात्र जरांगे यांचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. या वादामुळे समाजामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.समाजा मध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे आणि बार्शीचे आ. राजेंद्र राऊत या दोन्ही मराठ्यातील वैचारीक मतभेद मिटावा यासाठी मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक दिलीप कोल्हे, दास शेळके, सुनील रसाळे यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही मराठा बांधवांची भूमिका एकच आहे. मराठ्यांना ओबीसीतून सगे सोयर्यांसह आरक्षण मिळावे त्या दृष्टिकोनातून वाटचाल ही सुरू आहे. त्यामुळे समाज बांधवांनी एकमेकांवर टीकात्मक भाष्य करू नये एकोप्याने राहावे आणि आपली आरक्षणाची मराठ्यांची लढाई यशस्वी करावी ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.
राज्यशासन सकारात्मक आहे. दोन समाज बांधवामधील वादामुळे समाजामध्ये गैरसमज पसरत आहे. समाजामध्ये दुफळी माजण्याची शक्यता आहे. हे समाजासाठी घातक आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जालना अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची तर आणि बार्शी येथे आ. राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन एकोपा घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि दोघांनीही यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दास शेळके, सुनील रसाळे, विजय पोखरकर, बाळासाहेब सुरवसे उपस्थित होते.