मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक उपोषण सुरु होते मात्र आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.
मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली ही आणखी एक संधी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, मनोज जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे-घेणे नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.