ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२५ मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

नगरपरिषदेने केले अकराशे मूर्तींचे संकलन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

पारंपारिक वाद्यांचा निनाद, धार्मिक विषयांवरचे देखावे, शिस्तबद्ध लेझीमचा खेळ,आकर्षक विद्युत रोषणाई,गणेश भक्तांचा अमाप उत्साह अशा चौफेर आनंदात अक्कलकोट शहरात श्री गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर कुठल्याही मंडळाने देखावे सादर केले नव्हते.मात्र विसर्जनाच्या दिवशी एकापेक्षा एक सरस देखावे सादर करून अक्कलकोटकरांचे लक्ष वेधून घेतले.सायंकाळी पाच नंतर श्री गणेश मिरवणुकीला शहरामध्ये सुरुवात झाली.रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत ही मंडळी कारंजा चौक ते सेंट्रल चौक दरम्यानच पाहायला मिळाली.त्यानंतर हळूहळू गतीने मंडळाच्या मिरवणुका पुढे सरकल्या.या दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,अशपाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील,दिलीप सिद्धे,मिलन कल्याणशेट्टी,प्रथमेश म्हेत्रे,शिवराज म्हेत्रे,बसलिंगप्पा खेडगी,सागर कल्याणशेट्टी,अविनाश मडीखांबे,शिवशरण जोजन,मोतीराम राठोड, यांच्यासह अनेक नेते मंडळींनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटी देत पूजा करत शुभेच्छा दिल्या.

उत्तर हद्दीमध्ये  ५५ सार्वजनिक गणेश मंडळे होती.यात  ३७ शहरात तर ग्रामीणमध्ये १८ मंडळे होती. दक्षिण हद्दीमध्ये ३५ मंडळांनी मिरवणुका काढत श्री गणरायाला आनंद आणि उत्साहाच्या भरात निरोप दिला.अक्कलकोट शहरामध्ये बंजारा गणेशोत्सव तरुण मंडळाने देवीचा देखावा सादर केला होता. गोल्ल वस्ती गणेश मंडळ ,श्री राम नगर गणेशोत्सव तरूण मंडळ, ब्रम्हांडनायक गणेशोत्सव तरुण मंडळ समर्थ नगर, अक्कलकोटचा राजा गणपती मंडळ,जुना राजवाडा या मंडळांनी विविध प्रकारचे छोटे – मोठे देखावे सादर करून महिला आणि लहान गोपाळांचे लक्ष वेधून घेतले.श्रीमंत पिंपळया मारुती गणेशोत्सव पागा चाळ श्रीमंत कमला राजे चौक मंडळाने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिर,अक्कलकोट बस स्टॅन्ड तसेच उजनीचे पाणी, रस्ते विकास कामांचा देखावा सादर केला.कारंजा चौक येथील नवभारत गणेश तरुण मंडळाने शेती आणि शेतकरी या विषयाकडे लक्ष वेधत बळीराजाचा देखावा सादर केला.

डिके ग्रुपने बहारदार लेझीमचा खेळ सादर केला.खासबाग येथील मंडळाने मोबाईलपासून लहान मुलांना कसा धोका आहे हे देखाव्याद्वारे संदेश दिला. या मिरवणुकीमध्ये श्री स्वामी समर्थां बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल ज्ञानेश्वर महारावांचे निषेध करणारे फलक गणेश मंडळाने तयार केले होते. सोलापूरच्या विमानसेवेची नुकतीच चाचणी झाली. त्याविषयीचे सकारात्मक चित्र  मंडळाने केले होते.वीरशैव हरळया  गणेशोत्सव तरुण मंडळ,राम गल्ली,समाधी मठ,अष्टविनायक गणेश मंडळ,बेडर कन्हैया चौक, वेताळ चौक श्रीमंत संभाजीराजे चौक,आझाद गल्ली ,पंजाब तालीम मित्र मंडळ, बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळ ,जय हनुमान गणेशोत्सव तरुण मंडळाने परंपरेप्रमाणे धार्मिक विषयाकडे लक्ष वेधत देखावे सादर करून उत्सवात भरीवपणा आणला.नगरपरिषदेतर्फे शहरातील प्रमुख ठिकाणी बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. पोलिसांनी हत्ती तलाव, मैंदर्गी नाका, राजे फत्तेसिंह चौक, सावरकर चौक, कारंजा चौक, एसटी बसस्थानक या ठिकाणी फिक्स पॉइंट केले होते. ग्रामीण भागातील मैंदर्गी,दुधनी, तडवळ, जेऊर, करजगी, चपळगाव ,किणी, कुरनूर ,वागदरी, शिरवळ या भागातील गणेश मूर्तींचे शांततेत विसर्जन झाले.विसर्जन मिरवणुकीतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागाने कडक बंदोबस्तासाठी अधिकारी, कर्मचारी असे मिळून २९० जणांचा कडक बंदोबस्त होता.उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण हद्दीत पोलीस निरीक्षक महेश स्वामी, पीएसआय सिद्राम धायगोडे, सपोनि कांबळे, यांच्यासह ३ अधिकारी, ६८ पोलीस कर्मचारी, ५५ होमगार्ड तर उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तासाठी ७ अधिकारी, ६५ पोलिस कर्मचारी, ६५ होमगार्ड, एक एसआरपी प्लाटून असे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सपोनि निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे, पीएसआय पवार, पंडित चव्हाण, सिद्राम चव्हाण, रामचंद्र राठोड यांच्यासह
मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री बारा वाजण्याच्या आत सर्वच मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करत श्री गणरायाचे विसर्जन केल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला.

नगरपरिषदेची मूर्तीदान संकल्पना यशस्वी

अक्कलकोट नगर परिषदेने घरगुती गणेशोत्सवासाठी यावेळी मूर्तीदान संकल्पना राबवली होती.त्या संकल्पनेला शहरवासीयाने चांगला प्रतिसाद देत हत्ती तलावात वैयक्तिक विसर्जन करण्याचे प्रकार टाळले आणि नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकराशे मूर्तीचे संकलन झाले आहे त्या मूर्ती नंतर विसर्जित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!