सोलापूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पुण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर आता नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शनिवारी होणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सप्टेंबरअखेर प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे.
राज्यस्तरीय मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून आता शनिवारी अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानापूर्वी दोन महिने अगोदर प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केला जात आहे. सध्याच्या कार्यवाहीनुसार राज्याच्या विधानसभेची निवडणूक १५ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होवू शकते. दिवाळीनंतर निवडणूक होऊन २३ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल, असेही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यावर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २२ हजार कर्मचारी घेण्याचा निर्णय घेतला असून सध्या त्यांची तालुकानिहाय माहिती ऑनलाइन भरण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला. यावेळी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख आदी उपस्थित होते.
तयारी विधानसभा निवडणुकीची
एकूण मतदार
३७.६४ लाख
एकूण मतदान केंद्रे
३,७२३
‘ईव्हीएम’ची संख्या
५,०००
एकूण मतदान कर्मचारी
२२,०००
मतदान वाढीसाठी गावोगावी ‘ईव्हीएम’चे प्रात्यक्षिक
आगामी विधानसभा निवडणुकीत किमान ७५ टक्के मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘ईव्हीएम’द्वारे मतदान कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक गावोगावी दाखविले जात आहे. तसेच ‘ईव्हीएम’बद्दल मतदारांच्या मनात असलेला संभ्रम, शंका, प्रश्न देखील दूर केले जात आहेत. पुढील आठवड्यात त्याचे प्रात्यक्षिक उच्च महाविद्यालयांमध्ये होणार आहे. मागील निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालेल्या गावांची (मतदान केंद्रे) यादी तयार करून त्याठिकाणी देखील मतदान वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत
प्रशिक्षणाचा टप्पा सप्टेंबरपर्यंत उरकण्याचे निर्देश
निवडणुकीच्या साधारणत: दोन महिने अगोदर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण होतात. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आता शनिवारी (ता. २१) नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. सप्टेंबरअखेर प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण होतील. निवडणूक जाहीर झाल्यावर इलेक्शन ड्यूटीसाठी नेमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
– गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर