वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील वर्धा शहरात आज दि.२० रोजी पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला १५ हजार विश्वकर्मा, ५ हजार IT प्रशिक्षणार्थी, २० हजार महिला बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमात विविध योजनांचे लोकापर्ण केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाचे खास गिफ्ट दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर आज ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करत त्यांचे आभार मानले. त्यासोबतच अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची अनोखी भेटही दिली. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले.
“वर्ध्याच्या पावनभूमीत आज महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ होत आहे. याशिवाय पायाभरणी होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून मी तुमचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी तुमचे स्वागतही करतो. पंतप्रधानांनी वेळ दिला म्हणून त्यांचेही मनापासून स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. त्याबद्दल मी महाराष्ट्र जनतेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि , अशी मी आशा व्यक्त करतो. तसेच पंतप्रधान मोदी व्हिजन आपल्या भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे”, असे अजित पवार म्हणाले.
“शेतकरी महिला व इतर घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद केली आहे. अमरावती येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्सटाईल पार्कमुळे खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील. यामुळे १ लाख रोजगार निर्मिती शक्यता आहे. गेल्या १० वर्षांत पंतप्रधानांनी पायाभरणी केलेल्या कामाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील कुशल भारत बनवण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे योगदान देईल”, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.