मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात राजकीय चर्चा रंगायला लागला आहे. आरोपांच्या फैरी झडत आहे. येत्या निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेक जण फुटीर होत आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी फोडाफोडाच्या राजकारणाला ऊत आला. त्याचे पडसाद अजूनही अनेक विधानसभा मतदार संघात दिसत आहेत. आता काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. फडणवीस यांनी आमचे घर फोडल्याचा गंभीर आरोप या माजी मंत्र्यांनी केला आहे.
कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, असा आरोप चव्हाण यांनी केला. लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा आरोप केला आहे. चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळावा घेत आहेत.
ही आमची पण चूक समजतो. आमच्या धाकट्या मुलाच्या मित्रांनी फडणवीस यांना बोलावले होते. त्याने कारखाना चालवायला घेतला होता. सोलापूरला फडणवीस आले होते. ते दोघे तिथे होते. सोलापूरजवळ मी खंडोबाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी समोरुन ताफा आला. मी विचारलं कोण आलं. तेव्हा कळलं की देवेंद्र फडणवीस आले आहेत. मी पण तिथे गेलो. त्यांची आणि माझी ओळख होतीच. मी उपाध्यक्ष असताना सर्वांशी माझे चांगले संबंध होते. या भेटीविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली. मी त्यांना म्हटले, साहेब हे तुम्ही अत्यंत चूक केली आहे. आमचं घर फोडून तुम्ही आम्हाला अस्वस्थ केले आहे. आम्हाला बदनाम केलं. त्याचं दु:ख आम्हाला आहे. तुम्हाला ते कधी तरी फेडावं लागेल. एका संपर्क सभेत मधुकरराव चव्हाण यांनी मनातील खदखद अशी बोलून दाखवली.