पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता शरद पवार गट देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली आहे. मी कधीच जय श्री राम म्हणत नाही. मी नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी सुळें यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते.
दरम्यान या गोधळानंतर बोलताना सुप्रिया सुळेंनी आपण इथे पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानन्यासाठी आलो आहेत असे म्हटले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना जोरदार घोषणाबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपले भाषण सुरुच ठेवले.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाषण करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या. त्याच वेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरवात करताच खासदार सुळेंनी आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानन्यासाठी इथे जमल्याचे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला आलो आहोत. त्यांच्याबरोबर बरेच वर्षे संसदेत काम करायची संधी मिळाली. सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत. त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही. ते काम बघतात. माझ्या मातदार संघात जी रस्त्याची कामे सुरु आहेत, ती चांगल्या दर्जाची होत आहे. गडकरी साहेबांनी माझ्या मतदार संघासाठी सर्वात महत्वाचे काम केले आहे.