मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या राजकीय पक्ष निर्माण झाला आहे. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला आता निवडणूक आयोगाच्या वतीने पक्षाचे चिन्ह देखील देण्यात आले आहे. या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या माध्यमातून राज्यात तिसऱ्या आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ते करत आहेत. त्यात आता संभाजीराजे यांच्या पक्षाला स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता देखील दिली आहे.