मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना 10 टक्के जागा देणार आहे. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला चारपैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे युतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.
अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी 3,000 रुपये मिळतील.” ते म्हणाले की, “मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचे आहे की, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने लढवण्यात येणाऱ्या 10 टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 14 मतदारसंघात ‘व्होट जिहाद’ झाल्याचा दावा केल्यानंतर अल्पसंख्याक समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. या आधी धुळे मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी फडणवीस यांनी ‘व्होट जिहाद’ला जबाबदार धरले होते. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.