ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपात तिकीट वाटपावरून नाराजी ; शिंदेंना झुकते माप ?

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून महायुतीमध्ये जागावाटपची चर्चा सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहे. यावेळी पंतप्रधान ठाण्यात मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनच्या उद्घाटन करणार आहे. मुंबई ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात करणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे ठाण्यात कार्यक्रम होत असल्याने भाजपमधील नेते अन् कार्यकर्ते नाराज झाले आहे.

राज्यातील विविध महामंडळांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे सत्तेतील लाभ व महत्वाची पदे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होत आहे. भाजप कार्यकर्त्यांना त्याग अन् काम करण्याचे धडे पक्षातील श्रेष्ठींकडून देण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदार संघाचा तिढा चांगलाच पेटला होता. भाजप कार्यकर्ते ठाणे मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यास तयार नव्हते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दबाव आणून ही जागा शिंदे गटाला सोडण्यास भाग पाडली. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने ठाणे जिल्ह्यातील भाजपला हव्या असलेल्या काही जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे श्रेय शिंदे आणि पवार गटाला मिळत असल्याने भाजपमध्ये नाराजी वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!