ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सावरकरांचा अवमान करणे सोडा : सुशीलकुमार शिंदेंचा आत्मचरित्रातून सल्ला

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत आहे तर दुसरीकडे काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते, गांधी घराण्याचे निष्ठावंत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पुस्तकात सावरकरांचा गौरव केला आहे.

एकीकडे राहुल गांधी, मणिशंकर अय्यर हे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करत असताना काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते, गांधी घराण्याचे निष्ठावंत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पुस्तकात सावरकरांचा गौरव केला आहे.

‘सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकारणाची ५० वर्षे’ या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात शिंदे यांनी लिहिले आहे की वीर सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. त्यामुळेच १९८३ मध्ये नागपूरमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातून येतो. त्यामुळे वीर सावरकरांनी जे प्रयत्न केले त्याचे महत्त्व मला ठाऊक आहे.
‘वीर सावरकर आणि त्यांचं हिंदुत्व यांचीच चर्चा होते. वीर सावरकर यांच्यातला विज्ञानवादी दृष्टिकोन, त्यांचं तत्त्वज्ञान, सामाजिक बांधिलकी, समाजातले सगळे घटक एकत्र यावेत म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न याकडे का पाहिलं जात नाही? वीर सावरकरांबाबत संकुचित विचार करणं हे काही योग्य नाही. मी राजकारणात प्रदीर्घ काळ घालवला आहे. मला आता असं वाटतं की काँग्रेस पक्षाने सावरकरविरोधाची ही विचारधारा बदलली पाहिजे.’ असेही शिंदे यांनी म्हटले आहे. यातून अप्रत्यक्षपणे राहुल गांधी व काँग्रेसच्या वाचाळवीर नेत्यांनी सावरकरांचा अवमान करणे सोडावे असे सुनावले आहे, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात दबक्या आवाजात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!