अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आई राजा उदो उदो, सदा नंदीचा उदो उदो,आई भवानी माते की जय असा जयघोष करत अक्कलकोट शहर आणि तालुक्यात गुरुवारी सायंकाळी जल्लोषात शक्ती देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त ग्रामीण भागात देखील
मोठा उत्साह पाहायला मिळाला.भक्तीमय वातावरणामध्ये घरोघरी घटस्थापना करण्यात आली.शहर आणि तालुक्यात विविध गावांमध्ये ११२ मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
यात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे अंतर्गत शहरात १७ तर ग्रामीणमध्ये ३१ मंडळांनी या उत्सवात सहभाग घेतला तर दक्षिणमध्ये ६४ मंडळांनी शक्तीदेवीची प्रतिष्ठापना करत या उत्सवाला प्रारंभ झाला.दोन्ही पोलीस ठाणेकडून शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत सर्व मंडळांच्या अध्यक्षांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोन दिवसांपूर्वी काही सूचना देण्यात आल्या होत्या.त्या सर्व सूचनांचे पालन करत मंडळाने शक्ती देवींच्या मिरवणुका काढत मोठ्या उत्साहात खासबाग,हसापूर रोड,म्हाडा कॉलनी,फत्तेसिंह चौक,समर्थ नगर आदी ठिकाणी विविध चौकांमध्ये देवीची प्रतिष्ठापना केली.यात पारंपारिक वाद्य होते. अनेक ठिकाणच्या देखाव्याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले,प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,दिलीप सिद्धे,मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या महिन्यात देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते.घटस्थापना करून या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. उत्सव काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे आणि दक्षिणचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी मंडळाच्या ठिकाणी बंदोबस्त लावला आहे.दक्षिणमध्ये ३५ होमगार्ड,२५ पोलीस कर्मचारी,तीन अधिकारी तर उत्तरमध्ये पाच अधिकारी,३५ पोलीस आणि ३५ होमगार्ड, एक दंगा काबू पथक असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अन्नछत्र मंडळाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी
यावर्षी अक्कलकोटमधील नवरात्र मंडळाने देखाव्यांवर मोठा भर दिला आहे.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील नवीन श्री तुळजाभवानी मंदिराजवळ शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.कारंजा चौकातील नवरात्र मंडळांने अयोध्येतील राम मंदिराचा देखावा लक्षवेधी केला आहे.बस स्टँडवरील श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नवरात्र मंडळाने शिवतांडव नृत्याचा देखावा सादर करून या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.