मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसापासून अनेक मोठे निर्णय घेत असून यावर विरोधक सडेतोड टीका देखील करीत आहे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी महायुतीचे सरकार जाण्याची वेळ आल्याचा दावा केला. घटनात्मक पदावर असणारे विशेषतः सत्ताधारी पक्षात असणारे नरहरी झिरवळ हे नैराश्यातून मंत्रालयात उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ हे सरकार जाण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्यात.
सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या हक्क मागतोय महाराष्ट्र या अभियानाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ हे अभियान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्याकडून सुरू करण्यात येत आहे. राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, महिला असुरक्षित आहे ही गंभीर बाब आहे. गृहमंत्री राज्यात अपयशी ठरले असून पुण्याची ओळख आता गुन्ह्याची राजधानी झाली आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य असलेले महाराष्ट्रला प्रत्येक क्षेत्रात दुय्यम स्थान देण्याचा आणि महाराष्ट्र राज्य खाच्चिकरण करणे सत्ताधारी यांच्याकडून सुरू आहे. राज्यात आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे. सत्ताधारी यांचा महाराष्ट्र द्रोह उघड करण्यासाठी आणि राज्याचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महायुती सरकारला घरी पाठवणे हेच आता आमचे काम आहे. पुण्यातील बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक बलात्कार होत आहे. पण सरकारला कोणती नैतिकता राहिलेली नाही. महायुती सरकारचा गलथान कारभाराची माहिती देणारी चार्जशीट ही आमच्या पक्षाकडून तयार करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते ही चार्जशीट राज्यातील प्रत्येक घरात नेणार आहे. राज्यातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. पक्षाचे वतीने ‘हक्क मागतोय महाराष्ट्र ‘हे गीत देखील तयार करण्यात आली असून त्यातून राज्यातील जनतेचा आक्रोश दाखवणार आहे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सध्या राजकीय हवा बदलत आहे. त्यामुळे जे पक्ष 2 जुलैपासून पवार साहेबांसोबत सोबत राहिले त्यांचा मानसन्मान यापुढे कायम राहील याची जबाबदारी माझ्यावर आहे. संघर्ष काळात जे सोबत राहिले त्यांना आम्ही विसरणार नाही. मोठे आदिवासी नेते नरहरी झिरवाळ हे घटनात्मक पदावर आहेत. सत्ताधारी पक्षात आहेत. पण ते नैराश्यातून मंत्रालयात जाऊन जाळीवर उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ हे सरकार जाण्याची वेळ आली आहे. सरकारला केवळ सर्वांचे मृतदेह बघायचे आहेत. हे गलिच्छ राजकारण आहे. सरकारला झोप कशी लागते. हा घडलेला प्रकार काळा दिवस आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढलेला असताना सरकार कोणत्या उपाययोजना करत नाही.