मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी व महायुतीमध्येच लढत होणार असल्याचे चित्र असतांना यातच राज्यांमध्ये परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा या तिसऱ्या आघाडीत समावेश आहे. या तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या आघाडीचा नक्कीच परिणाम होईल, माझी तर झोप गेलीये, आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. अशा शब्दात पवारांनी या तिसऱ्या आघाडीला टोला लगावला आहे.
या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर देखील टीका केली आहे. संभाजीराजे यांच्यासारखे महान घराण्यातील लोक या तिसऱ्या आघाडीत आहेत. यामुळे नक्कीच परिणाम होईल. असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ आहोत. आता आमचे काय होणार? असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीकडे पाहिले जात आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाचा देखील समावेश आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक आयोगाकडे नुकतीच आपल्या पक्षाची नोंदणी केली आहे. या संदर्भात या तिसऱ्या आघाडीची प्रमुख बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. या बैठकीतच त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असे नाव देण्यात आले आहे. या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.