मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना नुकतेच भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिली आहे. या संदर्भातला प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर तुम्ही नवीन काय सांगताय? ही तर जुनी न्यूज आहे. ती आजची न्युज थोडीच आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर अजित पवार यांच्या पक्षाचा दावा आहे. विद्यमान आमदार अजित पवार यांचा असल्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते तुतारी हाती घेणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशामुळे पक्षातील जुने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. प्रवीण माने यांनी या संदर्भात उघड नाराजी व्यक्त केली आहे. प्रवीण माने यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले होते, अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे आता प्रवीण माने काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रवीण माने यांची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे या त्यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.