सावत्र भावांनी कितीही जोर लावला तरी लाडकी बहीण बंद होणार नाही
अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्यात आम्ही जेंव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. तेंव्हा अनेक सावत्र भाऊ तयार झाले. ही योजना बंद होण्यासाठी काहीजण न्यायालयातही जात आहेत पण लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, जोपर्यंत तुमचा लाडका देवेंद्र भाऊ मुंबईत आहे. तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही,असा विश्वास देतानाच सत्तेवर येताच ही योजना बंद करू म्हणणाऱ्या नागपूरच्या काँग्रेस नेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटच्या जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला.मंगळवारी,अक्कलकोट
येथील फत्तेसिंह मैदानावर आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर माजी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, राम सातपुते,माजी आमदार प्रशांत परिचारक, शहाजी पवार, शिवानंद पाटील,अविनाश महागावकर,भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,शहराध्यक्ष शिवशरण जोजन,मिलन कल्याणशेट्टी,महेश हिंडोळे,यशवंत धोंगडे ,सुरेखा होळीकट्टी आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पूर्वी अक्कलकोटला टेलेंड म्हणून हिणवायचे.निधी देताना दुजाभाव करायचे पण आता आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विकासाची सुरुवातच अक्कलकोटपासून
सुरू केलेली आहे.आतापर्यंत मतदार संघाच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जे जे सांगितले ते ते आम्ही केले.
कुठलीही कसर आम्ही त्यांनी दिलेल्या मागण्यांमध्ये केलेली नाही.रस्ते, आरोग्य, पाणी ,वीज, मंदिर या सर्व विषयांच्या बाबतीत या तालुक्याला भरघोस निधी देण्याचा प्रयत्न केला. हा निधी मिळविण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रयत्न देखील तितकेच महत्वाचे होते.शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याचे काम या सरकारने केले. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्याचा निर्णय अलीकडच्या काळात घेतला.शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, ही अनेक दिवसांपासूनची मागणी शेतकऱ्यांची होती.ती पूर्ण केली.आता दिवसा बारा तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे.यासाठी स्वतंत्रपणे देशातील पहिली वीज कंपनी महाराष्ट्रामध्ये तयार केली.राज्यात बारा हजार मेगावॅट सोलरचे प्रोजेक्ट केले.त्यामुळे विजेसाठी आता रात्रीचे शेतकऱ्यांना शेतात जायची गरज पडणार नाही.हा त्रास देखील वाचणार आहे.पूर्वी वीज राज्य सरकारला आठ रुपयाला मिळत होती.ती आता तीन रुपयाला मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा आता विजेचा विषय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक सौर कृषी
पंप योजना आणली.यात शेतकऱ्यांनी फक्त दहा टक्के रक्कम भरायचे आहे.९० टक्के सरकार भरणार आहे.अर्ज केल्यास फक्त एका महिन्यात पंप मिळणारे अशी योजना आम्ही तयार केली.एक रुपयात पिक विमा आणला.आठ हजार कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना दिला.मुलींच्या जन्माचे स्वागत म्हणून लेक लाडकी योजना आणली.
याचा फायदा आज अनेक कुटुंबांना होत आहे.महिलांना एसटीमध्ये अर्धा तिकिटात प्रवास करण्याची योजना आणली. मुलींना उच्च शिक्षण मोफत केले.लाडकी बहीण योजनेवर तर विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. ही योजना चालणार शकणार नाही.
हे काय पैसे देणार म्हणून.पण ही योजना सुद्धा आम्ही यशस्वी करून दाखविली आणि पुढच्या दोन महिन्याची ऍडव्हान्स रक्कम सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहोत. तुमचे सरकार आहे ,तुमचा आशीर्वाद आहे म्हणून हे शक्य झाले.दादांना ताकद द्या, मी तुमच्यासोबत आहे.कुठलेही विकासकामे शिल्लक राहणार नाहीत,असा शब्द त्यांनी यावेळी दिला. सभेच्या प्रारंभी श्री स्वामी समर्थ व छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यानंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अक्कलकोट मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह त्यांचा भव्य सत्कार केला.या कार्यक्रमास विलास गव्हाणे, प्रवीण शहा,अण्णाराव बाराचारी,अविनाश मडीखांबे,नन्नू कोरबु, परमेश्वर यादवाड,
रामप्पा चिवडशेट्टी,मल्लिनाथ स्वामी, गजानन होनराव,संजय देशमुख, प्रभाकर मजगे,आप्पासाहेब पाटील,अप्पू परमशेट्टी,अंकुश चौगुले आदिंसह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन ऐश्वर्या
हिबारे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष जोजन यांनी मानले.सभास्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जे मागितले ते देवेंद्रभाऊंनी दिलं …
मी आमदार झाल्यानंतर अक्कलकोट मतदार संघाच्या विकासासाठी देवेंद्रभाऊ यांच्याकडे जे जे मागितले ते ते दिले.मी मागितले आणि त्यांनी दिले नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.इतकं लक्ष त्यांनी अक्कलकोटकडे दिले म्हणून विकासाचा अनुशेष भरून काढला गेला.आज एक रुपयात पिक विमा योजनेत ६३ हजार शेतकऱ्यांना
५० कोटी रुपये मिळाले हे केवळ महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाले.सचिन कल्याणशेट्टी,आमदार
फडणवीसांकडून ‘पाणीदार आमदार’ असा उल्लेख
२७ वर्षापासून प्रलंबित असलेल्या एकरूख उपसा जलसिंचन योजनेला खऱ्या अर्थाने सुप्रमा देण्याचे काम आमच्या सरकारने केले. त्यामुळे विरोधकांना श्रेय घेण्याचा अधिकार नाही.ज्यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी दिली त्याचवेळी त्यांना पाण्याचा शब्द दिला होता. तो शब्द मी खरा केला आणि त्याचा पाठपुरावा देखील आमदार कल्याणशेट्टी यांनी अतिशय तडफेने केला म्हणून त्यांना आम्ही पाणीदार आमदार असे म्हणतो
असा उल्लेख करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची जोरदार प्रशंसा केली.
अक्कलकोटने भाजपला ‘हिरा’ दिला
मला आमदार कसा असावा हे जर कोणी विचारले तर मी सांगेन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासारखा असावा.कारण त्यांच्या कामाची पद्धत,त्यांच्याकडचे कौशल्य आणि त्यांनी केलेली पाच वर्षातील मतदार संघातील विकास कामे. त्यातून मतदारसंघाचा कायापालट झाल्याचे चित्र दिसून येते असे सांगून आपण आमदार कल्याणशेट्टी यांच्या रूपाने आम्हाला ‘हिरा’ दिला असे सांगत कल्याणशेट्टी यांचे कौतुक केले.
उजनीच्या पाण्याचे जलपूजन अन विकास कामांचे भूमिपूजन
अक्कलकोट उपजिल्हा रुग्णालय १०८ कोटी, देगाव एक्सप्रेस कॅनॉल वितरिकेसाठी ३५० कोटी,अक्कलकोट शहर भूमिगत गटार योजना १६८, कोटी अक्कलकोट शहर रस्ते विकास कार्यक्रम १०२ कोटी, अक्कलकोट शहर नवीन पाणीपुरवठा साठी ७५ कोटी, अक्कलकोट- तडवळ -कोर्सेगाव – बरूर रस्ता २८६ कोटी, मैंदर्गी शहर पाणीपुरवठा २६ कोटी,दुधनी शहर पाणीपुरवठा ४७ कोटी, दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालय २ कोटी, अक्कलकोट दक्षिण व उत्तर पोलीस ठाणे इमारत १० कोटी ३४ लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भाग दोन ६१ कोटी,कर्जाळ जैवविविधता उद्यान २५ कोटी अशा अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उजनीच्या पाण्याचे जलपूजन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच कार्यक्रमात करण्यात आले.