नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणातील लोकांनी कमाल केली आहे. काँग्रेसचे पितळच त्यांनी उघडे केले. सत्ता नसेल तर पाण्याशिवाय मासळी तडफडते, तशी गत काँग्रेसची होते. सत्तेसाठी मग देशाला घातक ठरणारे राजकारण करायलाही काँग्रेस मागेपुढे बघत नाही. आम्ही देशातील समाज एकवटण्याचा प्रयत्न करतो. ते जाती-जातींत विष कालवण्याचे काम करतात, असा घणाघात करून देश आता नव्या वाटेवरून निघालेला आहे. काँग्रेसच्या देशविघातक राजकारणाला तो फशी पडणार नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
हरियाणाच्या निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. हरियाणा ही कुरुक्षेत्राची भूमी आहे. भगवत्गीतेची भूमी आहे. या भूमीवर सत्याचा त्रिवार विजय झालेला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जम्मू – काश्मीरमध्ये दशकानुदशकांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदा शांततापूर्ण निवडणुका झाल्या. हा भारतीय संविधानाचा विजय आहे. भारताच्या लोकशाहीचा विजय आहे. नवरात्रीचा आज सहावा दिवस आहे. कात्यायनी मातेच्या उपासनेचा हा दिवस आहे. आई कात्यायनी सिंहावर स्वार होऊन, हातात कमळ घेऊन आज आम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरियाणात तिसर्यांदा कमळ फुलले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.