सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस विभागाची मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व टेंभुर्णी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने टेंभुर्णी शहरात धाड टाकून गांजा व इतर साहित्य असा एकूण 2 लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.8) करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी शहरात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोसई हनुमंत वाघमारे त्यांचे सहकारी व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोनि दीपक पाटील यांच्या पथकाने सयुंक्तपणे कारवाई करून टेंभुर्णी (ता.माढा) येथील सिध्दार्थनगर मधील सुरज बबन लोंढे याच्या घरी (घर नंबर -११४५) धाड टाकली. तेथे लोंढे याच्या राहत्या घरात पोलिसांना हिरवट व काळपट रंगाचा उग्र वासाचा गुंगी आणणारा मादक पदार्थ १३ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी तो गांजा ताब्यात घेऊन रीतसर जप्त केला आहे. त्याची वीस हजार रुपये कि.ग्रॅ.प्रमाणे २ लाख ६० हजार रूपये किमंत होत आहे.तसेच गांजा बरोबर वजनकाटा,प्लास्टिक पिशव्या असे इतर तीन हजार रुपये किमतीचे साहित्य ही पोलिसांनी जप्त केले आहे.
टेंभुर्णी शहरात पोलिसांनी धाड टाकून गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.टेंभुर्णी शहरात अवैध व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत असून पोलिसांनी हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. याबाबत पोसई हनुमंत झुंबर वाघमारे (वय-३४) यांच्या फिर्यादीवरून एपीआय गिरीष जोग यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.