ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात यंदा चार दसरा मेळावे : राज्यातील जनतेचे लक्ष लागून !

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून दुसरीकडे आज विजयादशमी दिनी चार दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपरिक मुंबईतील शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासह शिवसेना शिंदे गटाचा मुंबईतील आझाद मैदानावरील मेळावा, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील मेळावा आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचा नारायणगडावरील मेळावा या सर्व दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथा शिंदे, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळासह सार्‍यांच्या नजरा लागल्या आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेचा स्वतंत्र दसरा मेळावा घेतला होता. त्यावेळी शिवाजी पार्कच्या जागेवरून दोन्ही शिवसेनेत वाद झाला होता. न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यामुळे मुंबईत दोन्ही शिवसेनेचे स्वतंत्र दसरा मेळावे पाहण्यास मिळाले होते. यंदाही शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी शिवाजी पार्क आणि आझाद मैदान सज्ज करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा दसरा मेळावा प्रथमच होत आहे. बीडजवळील नारायणगडावर शनिवारी दुपारी एक वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. जरांगे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही याविषयी ते भूमिका जाहीर करणार काय, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून सुरू असलेल्या चालढकलीवर कोणती भूमिका घेणार, याकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!