मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज सर्वत्र विजया दशमीचा उत्साह सुरू असून दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील होमगार्डचे मानधन जवळपास दुप्पट करणार असल्याची घोषणा केली आहे. या संबंधीचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे. 1 ऑक्टोंबर पासून राज्यातील होमगार्डला ही वाढ देण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात आहे. यामध्ये विविध समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात येत आहे. मदरसामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मानधानात देखील वाढ करण्यात आली आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. त्यातच आता राज्यातील होमगार्डांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 55 हजार होमगार्डला होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मानधना बरोबरच उपहार भत्ता आणि भोजन भत्ता यात देखील दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहिले की, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सद्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.