ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात दि.१५ पासून आचार संहिता लागली असून आता राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी सज्ज झाले असून हरियाणातील पराभवाचा महाराष्ट्रातील मविआच्या जागा वाटपावर काहीही परिणाम नाही. आम्ही ११५ जागा लढवण्यावर ठाम आहोत, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सांगितले होते. ते दिल्लीत राहुल गांधींना भेटून आल्यामुळे त्यांच्या दाव्यात ठामपणा असेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी चित्र बदलले असून ११५ ऐवजी १०५ जागांवर लढण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. सूत्रांनी सांगितले की, जागा वाटपावरून कोणतीही ताणाताणी नको, असा नवा निरोप हायकमांडकडून मंगळवारी सकाळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आला. त्यानुसार काँग्रेस १०५, उद्धवसेना १०० आणि शरद पवार गट ८३ असा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

हरियाणाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बरेच खटके उडाले होते. उद्धवसेना नेत्यांनी अचानक जागा वाटपामध्ये आक्रमकता दाखवणे सुरू केले. जास्त जागा देण्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावांची घोषणा करण्याचा आग्रहही करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते आणि उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांसमोर उघडउघडपणे एकमेकांवर टीका करू लागले. तेव्हा शरद पवारांनी खा. राऊत यांना कडक शब्दात समज दिली. त्यामुळे ते एकदम गप्प झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले. पुढील काळात त्यांना प्रचाराची दगदग झेपणार नाही, असे म्हटले जात आहे. ते लक्षात घेऊन जास्त जागांची मागणी करणे परवडणार नाही, असा सूर उद्धवसेनेतून लावला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, शरद पवार यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांना समजावून सांगितल्यावर उद्धवसेना १०० पेक्षा कमी जागा लढण्यास तयार होणार आहे.

काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्य पिंजून काढले असून तीनही पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. बहुतांश मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आहेत. मविआत सर्वाधिक बैठकांचे सत्र काँग्रेसमध्ये सुरू आहे. मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यातील काही ज्येष्ठ काँग्रेस नेते दिल्लीत तळ ठोकून बसले आहे. ते उमेदवारांची नावे अंतिम करत आहेत. ८ दिवसात यादी घोषित होईल, असा दावा एका वरिष्ठ नेत्याने केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!