जननायक प्रमोद मोरे मित्रमंडळीच्या वतीने अंबाभक्तांची आरोग्यसेवा !
६५ हजार पायी जाणाऱ्या भाविकांवर उपचार ! जैन हॉस्पिटलचे ६० तज्ज्ञांचे पथक सेवेत !
सोलापूर : प्रतिनिधी
जननायक प्रमोद मोरे यांनी सोलापूर मार्गे तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या अंबाभक्तांच्या आरोग्यासाठी सोलापूर तुळजापूर महामार्गावर आरोग्य शिबीर आयोजित करुन दोन दिवसात तब्बल ६५ हजार भाविकांवर मोफत उपचार केले. जननायक प्रमोद मोरे मित्रमंडळ आणि सेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रसशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कोजागिरीनिमित्त सोलापूरहून तुळजापूरला देवीच्य दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी चार ते पाच लाख भाविक कोजागिरीचे औचित्य साधून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूरहून पायी चालत जात असतात. यांच्यासाठी दरवर्षी महामार्गावर विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने महाप्रसाद, पाणी वाटप करण्याचे आयोजन केले जाते. परंतु कल्पक नेतृत्व असलेल्या जननायक प्रमोद मोरे यांनी महाप्रसादाचे आणि पाणीवाटपाचे भरपूर स्टॉल असतात, त्याऐवजी आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले पाहिजे, असा विचार मांडला. त्यानुसार मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर तुळजापूर महामार्गावर चव्हाण फर्निचरच्या जवळ मोठा मंडप उभारुन आरोग्य शिबीराचे आयोजन केले. या मंडपात प्रथमोपचारासह दहा बेड टाकून त्यांना अडमिट करता येईल, अशा सुविधेसह सुसज्ज असे तात्पुरते रुग्णालयच उभे केले. जैन आयुर्वेद रसशाळेच्या ६० डॉक्टरांचे पथक, शुगर तपासणी, बीपी तपासणीची सोय आणि अंगदुखी, डोकेदुखी, स्नायुदुखीची औषधे, जखमांची मलमपट्टीची सोयीसह विविध आजारांच्या दहा लाख रुपयांची औषधे उपलब्ध करुन दिली. वेदनानाशक स्प्रे, झंडुबामच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवशी सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकनातून चालत येणाऱ्या हजारो भाविकांनी या शिबीराचा लाभ घेतला. जवळजवळ ६५ हजार भाविकांवर या शिबिरात उपचार झाले. यात चार ते पाच हजार रुग्णांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली. अनेकांना पित्ताच्या, डोकेदुखीच्या, स्नायुदुखीच्या गोळ्या देण्यात आले. अनेकांच्या शुगर बीपीची तपासणी करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे त्यांचे भाविकांमधून स्वागत व कौतुक होत आहे. मी स्वतः चालत आल्याने दुःख माहीत होतेः प्रमोद मोरे
आपल्या उपक्रमाबाबत बोलताना जननायक प्रमोद मोरे म्हणाले की, मी स्वतः आई तुळजाभवानीचा भक्त आहे. त्यामुळे मी सुध्दा तुळजापूरला पायी चालत गेलो होतो. तेव्हा माझ्या पायाला जखम झाली होती. पण देवीवरील भक्तीमुळे मी पायी वारी बंद केली नाही. प्रचंड वेदना सहन करीत मी ती पायी वारी केली होती. या वेदना आई जगदंबेच्या भक्तांना होऊ नये म्हणून मी आरोग्य शिबीर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मला सांगायला आनंद वाटतो की तुळजापूर ते सोलापूर या अखंड प्रवासाच्या महामार्गावर फक्त आम्हीच आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते, जिथे दहा-पंधरा पेशंटना आम्ही अडमिट करु शकत होतो. भक्तांच्या वेदना दूर करण्याचे काम आम्ही केले याचा आम्हाला आनंद आहे.
प्रमोद नावाच्या लेकरावर आई जगदंबेचा आशिर्वाद लाभोः लखाबाई सुरवसे
लखाबाई सुरवसे या ६० वर्षाच्या वृध्दा आपल्य सहकाऱ्यांसमवेत सोलापूरहून तुळजापूरला पायी निघाल्या होत्या. रस्त्यावरुन चालताना त्यांच्या पायात खिळा घुसला. त्यांच्या पायावर या शिबीरात मलमपट्टी करण्यात आली. वरुन बी. पी. तपासून तीन दिवसाच्या पेनकिल्लर गोळ्या आणि पायदुखीवर स्प्रे देण्यात आला. यावर आनंदी झालेल्या लखाबाई आजीने हे सरकारने आयोजित केले आहे का? विचारले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी नाही हे जननायक प्रमोद मोरे मित्रमंडळीच्या वतीने आयोजित केले आहे म्हणताच आजीबाई चमकल्या. तुळजापूरकडे तोंड करुन म्हणाल्या, आई जगदंबे, पायाला लागले म्हणून माझ्याकडून होणारी तुझी वारी चुकू न दिलेल्या माझ्या प्रमोद या लेकराला सगळं सुख दे ! त्याला तुझा आशिर्वाद लाभू दे! आणि त्या नमस्कार करून निघून गेल्या.