मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सर्वच पक्ष आता जागावाटपावरून चर्चा करत आहेत. यात वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 16 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने तिसरी यादी जाहीर केली होती. त्यात 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.
वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत शहदा, साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हादगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी,कोरेगाव, कराड दक्षिण अशा सोळा मतदारसंघाचा समावेश आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अंजन लक्ष्मण साळवे यांना उमेदवारी दिली आहे, तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून मनोहर जगताप यांना उमेदवारी घोषित केली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या महायुती सरकार, महाविकास आघाडी याच सोबत तिसरी आघाडी देखील तयार झाली असून यात राजू शेट्टी, बच्चू कडू तसेच छत्रपती संभाजीराजे आहेत. मात्र या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत रंगणार असल्याचे दिसत आहे. त्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही सर्वांचे लक्ष आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकसभेत महायुतीला फटका बसला तसा विधानसभा निवडणुकीतही बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.