कुडाळ वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणेंनी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून उमेदवारीही मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, निलेश राणे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राणे कुटुंबात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष सामावले आहे.
कुडाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शिवसेनेचा भगवा ध्वज आणि धनुष्यबाण हाती घेऊन निलेश राणेंनी पक्षात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर नारायण राणे आणि नितेश राणे सुद्धा उपस्थितीत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची निलेश राणे यांनी तयारी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते मतदारसंघात तयारी करीत आहेत. मालवण कुडाळची जागा भाजपकडे नसून शिंदे सेनेकडे असल्याने निलेश राणे यांनी मुंबईत दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. खासदार नारायण राणे यांनीही निलेश यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदेंकडून निलेश राणे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदीलही मिळाला आहे. अखेरीस निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लवकरच त्यांना उमेदवारीही जाहीर होणार असल्याची दाट शक्यता आहे.