ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट विधानसभेसाठी पंचरंगी लढत ?

सिद्धाराम म्हेत्रे आज तर आमदार कल्याणशेट्टी उद्या अर्ज भरणार

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी यंदा पंचरंगी लढत होणार असे दिसते.मुख्य लढत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी मत विभागणीचा फटका कोणाला याची चर्चा आता जोरकसपणे तालुक्यात सुरू झाली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे उद्या ( सोमवारी )शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल करणार आहेत तर महायुतीकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी हे शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली. यावर्षी दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची शक्यता फार कमी आहे.

दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये सरळ  लढत होण्याचे संकेत आहेत.उद्या माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल करणार असल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे.त्यानंतर जाहीर सभा ही पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता काँग्रेस कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ होईल.तर महायुतीकडून आमदार कल्याणशेट्टी हे मंगळवारी अर्ज भरणार आहेत.तिकडूनही शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे त्यांचे गावोगावी गाड्यांचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे हे उद्या अधिकृतपणे अर्ज भरणार आहेत.राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी सोमवारचा मुहूर्त साधला आहे. त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. यावेळी मनसेकडून मल्लिनाथ पाटील हे नशीब आजमावत असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.ते मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

आठ दिवसांपूर्वी अक्कलकोटची लढत दुरंगी किंवा तिरंगी होण्याचे संकेत मिळत असतानाच आजच्या घडीला ही निवडणूक पंचरंगी होण्याची दाट शक्यता आहे.यात मत विभाजनाचा धोका अटळ आहे पण तो फटका कोणाला हे मात्र सध्याच्या घडीला सांगता येणार नाही.आपल्या हक्काच्या मतांचे विभाजन होऊ नये यासाठी प्रमुख उमेदवार प्रयत्नशील आहेत.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीनंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती येणार आहे.काँग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे अक्कलकोटला प्रचाराला येणार असल्याची माहिती मिळत आहे तर भाजपकडून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा , नितीन गडकरी,पाशा पटेल यांच्या नावाची सध्या तरी चर्चा आहे. वंचितकडून संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ,राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर यांची अक्कलकोटला सभा होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या वेळेनुसार या सभांचे नियोजन या पाचही पक्षामार्फत सुरू करण्यात आले आहे. ती कुठे घ्यायची, कोण येणार याबाबत अद्याप निश्चितता नसली तरी तयारीला मात्र सुरुवात झाली आहे. काही गोष्टी दोन्ही पक्षाच्यावतीने गोपनीय ठेवण्यात येत आहेत.आज आणि
उद्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये आणखी काही अपक्ष अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि शक्ती प्रदर्शन करणे यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.

परवानगी काढण्याचे काम युद्ध पातळीवर

प्रत्यक्ष प्रचारासाठी पंधरा दिवसच मिळणार आहेत यामध्ये प्रत्येक गावात नेत्यांना पोहोचणे शक्य नसल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एक पहिली फेरी पूर्ण केली आहे. दुसऱ्या फेरीच्या वेळी मोठ्या गावात जाहीर सभांचे नियोजन करण्यात येत आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानगी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!