मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीसांनी सूतोवाच केले आहे. मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती.
मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसला कोल्हापूरमध्येही मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत रवी राजा यांच्या पक्षप्रवेश झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी मुंबई महापालिका गाजवली, विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते. पाच टर्म महापालिकेत निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावाने आहे, २३ वर्ष त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केले. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितले जाते. जनसंपर्क असलेला नेता आहे. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल. रवी राजा यांच्या माध्यमातून आमच्या संपर्कात अनेक लोक येत आहे. पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक त्यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका. प्रवेश होईल तेव्हाच सांगेन, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, पालिकेत आणि मुंबई शहरात ज्यांनी काँग्रेस टिकवून ठेवली, त्यापैकी रवी राजा आहे. रवी राजा यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. सायनमध्ये त्यांचे काम मोठे आहे. जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचे सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. दिवाळी दोन दिवस आहे. साधारण ४ ते ५ तारखेने जोराने प्रचार सुरू होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.