पंढरपूर वृत्तसंस्था
आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीत भाविकांना विठुरायाचे दर्शन चांगले घेता यावे यासाठी आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन खुले करण्यात आले आहे.
यंदा १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे. आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीला देखील भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत असतात. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागत असतात. यामुळे दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागते. भाविकांची गैरसोय थांबावी व विठ्ठलाचे दर्शन लवकर घेता यावे यासाठी विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शन २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून २० नोव्हेंबरपर्यंत विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू असणार आहे. या काळात विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद करण्यात येत असतात. तर विठ्ठलास केवळ नित्यपूजा , गंधाक्षता आणि लिंबू पाणी देण्यात येत. तसेच विठ्ठलाचा पलंग काढून विठ्ठलाच्या पाठी मऊ मुलायम लोड देत २४ तास दर्शन परंपरेप्रमाणे सुरू करण्यात आले. यामुळे भाविकांसाठी सोयीचे होणार आहे.