बीड वृत्तसंस्था
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. ते आज गाव भेट आणि संवाद दौऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील टाकरवण येथे बोलत होते. ‘माझ्या नादाला लागू नका. नादी लागला, तर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. मी अजून माझ्या समाजाला काहीच सांगितले नाही. समाजाला आदेश दिला, तर तुम्हाला गोळ्या सुरू करायची वेळ येईल’, असा उलटवार केला आहे.
‘पाडापाडी करायची तर करा, समाजाला कसे आरक्षण मिळवून देणार’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, ”आम्हाला राजकारणाचे काही देणेघेणे नाही. आमचा आरक्षण मागणीचा लढा सुरूच राहील. मी राज ठाकरेंना टाकरवण येथून आव्हान करतो माझ्या नादी लागू नका’, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
निवडणुकीतून माघार घेतली म्हणून काय वाईट झाले? मराठा समाजाचे काम करतो, दीडशे उमेदवारांचे काम करत नाही. कोट्यवधी मराठ्यांना अडचणीत आणणार नाही, की राजकारण करायचे असते तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. समाजाचे भविष्य पाहायचे आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. निवडणुकीत १५० जणांना उभे केले असते. त्यांच्यासाठी सहा कोटी मराठ्यांचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. माझ्या समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा.