चंद्रपूर वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१२) चंद्रपूर चिमूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोदी यांनी, देशातील शेतकऱ्याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असून सत्ता द्या, महायुतीने सोयाबीन शेतकऱ्यांना ६ हजार हमीभाव देण्याचे वचन दिल्याचे म्हटले आहे.
यावेळी मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार काम करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना किसान शेतकरी सन्मान योजना देत आहोत. आता महायुतीने देखील नमो शेतकरी योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना १२ हजार मिळत आहेत.
राज्यातील सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याची निर्यात कमी केली आहे. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जादाचे ५ हजार रूपये देत आहोत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव देवू असेही वचन महायुतीने दिल्याचे मोदींनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे. त्यांनी आपल्या काळात जलयुक्त शिवारला ब्रेक लावला. महायुतीने ती परत सुरू केली. गेल्या काही वर्षीत निळवंडे धरण आणि कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पही पूर्णत्वाकडे जात आहे. चंद्रपूरचे बांबू जगभर प्रसिद्ध असून आमच्या सरकारने बांबूशी निगडीत इंग्रजांच्या काळातील नियम बदलले. ज्यामुळे आता बांबूची शेती करणे सोपी झाल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.