ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार – देवेंद्र फडणवीस

अकोला, वृत्तसंस्था 

निवडणुकीच्या तोंडावर प्रचारसभा सुरु आहेत. भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. मध्यप्रदेशचे मंत्री विश्वास सारंग, खासदार अनुप धोत्रे, आमदार चित्रा वाघ, आमदार वसंत खंडेलवाल, सुहासिनी धोत्रे असे भाजपचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात फडणवीसांनी महायुती सरकारच्या योजनांचा पाढाच वाचला.

महायुती सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतलेत. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करु, हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूरमध्ये सव्वातीन हजार कोटींचा निधी आणला. उमा बॅरेज, पुनर्वसन ही विकासकामे त्यांनी केली. आपल्या मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाची कामे मार्गी लावली. निवडणूक झाल्यावर या मतदारसंघात आणखी 100 कोटींची कामे मंजूर होतील. समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले.

आपल्या भाषणात फडणवीसांनी महायुती सरकराने शेतकऱ्यांसाठी राबवविलेल्या योजनांसह इतर योजनांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, पोहरादेवी येथे 500 कोटी रुपयांची विकासकामे केली. ओबीसी, धनगर, भटक्या विमुक्त या समाजांसाठी महामंडळ आणि विविध योजना राबवल्या. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा दिला. शेतकरी सन्मान निधीचे 12 हजार रुपयांऐवजी आता 15 हजार रुपये देणार आहोत. शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास त्यावेळी फरकाची रक्कम राज्य सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरु आहेत. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेल. कृषिपंपाचे बील देखील शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही. पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही.

फडणवीस म्हणाले, विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली. मात्र, विरोधकांच्या नाकावर टिच्चून आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर अडीच कोटी रुपये टाकले. लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे समर्थक न्यायालयात गेले. मात्र आम्ही ही योजना सुरु ठेवली. राज्यात विकासात्मक कामे पूर्ण करून दाखवले.

पाच वर्षांत समृद्धी महामार्ग तयार केला. त्यामुळे उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन मिळून रोजगार निर्मिती होत आहे. नदीजोड प्रकल्पातून 550 कि.मी.ची नवीन नदी तयार करीत आहे. 88 हजार कोटीतून 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे काम केले जात आहे. आम्ही स्वप्न मोठी पाहतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!